अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- शहरातील जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेत करण्यात आलेले बेकायदेशीर नवीन बांधकामाचे अतिक्रमण काढण्याच्या मागणीचे निवेदन ट्रस्टचे विश्वस्त व मुस्लिम समाजाच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले.
यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, विश्वस्त आरिफ खान, हाजी वाहिद कुरेशी, अन्सार सय्यद, शेख अब्दुल कादिर, बरकतअली शेख, मुजाहिद कुरेशी आदी उपस्थित होते.
सदर अतिक्रमण तीन दिवसात न हटविल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील जुन्या कोर्टाच्या मागील बाजूस जामा मशिद आहे. ही मशिद औरंगाबाद वक्फ बोर्डकडे कायदेशीर नोंदणीकृत असून, ही मस्जिद एतिहासिक आहे. शहरातील सर्वात मोठी मशिद असून, शहरातील या जामा मशिदेला धार्मिक महत्त्व आहे.
मशिदीच्या जागेत ट्रस्ट व महापालिकेची कोणत्याही प्रकारे पूर्वपरवानगी न घेता गॅसोद्दीन शब्बीर हुसेन शेख याने बेकायदेशीर बांधकाम सुरु केले आहे. सदर इसमाने लोखंडी अँगल उभे करुन बांधकाम सुरु केले आहे.
सदर बांधकाम मशिदीच्या प्रवेशद्वारातच असल्याने ऐतिहासिक वास्तूपासून अत्यंत जवळ आहे. शासनाच्या नियमानुसार ऐतिहासिक वास्तूपासून तीनशे मीटरच्या आत कोणतेही बांधकाम खोदकाम पूर्वपरवानगीशिवाय करण्यास सक्त मनाई आहे. तरीदेखील गॅसोद्दीन शेख यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरु केलेले आहे.
अतिक्रमण विभागाने सदर बांधकामाची स्थळ पाहणी करून पंचनामा केलेला आहे. मनपा आयुक्त तथा प्रभाग अधिकारी याने शेख यांना पत्र पाठवून सदर ठिकाणी चालू असलेले बांधकाम थांबवून बांधकाम परवानगीचा तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे कळविले होते.
तरी देखील अतिक्रमण करणार्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारे खुलासा केलेला नाही. सदर प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी देखील महापालिकेच्या पुर्वपरवानगीने बांधकाम न करण्याचे सुचवले होते.
परंतू सदरचे बांधकाम सुरु ठेवण्यात आलेले आहे. हे अनाधिकृत बांधकाम तीन दिवसाच्या आत न पाडल्यास महापालिकेत मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|