अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-घरात घुसून अपंग पती, महिला व मुलींना मारहाण करणार्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस गुन्हे दाखल करत नसल्याने आदिवासी भिल्ल समाजाच्या
महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सदर आरोपींवर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी तक्रारदार जया शरद सूर्यवंशी, शरद सुर्यवंशी, छाया जाधव, साक्षी सुर्यवंशी, पायल माळी आदी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील अकोले नाका, एकलव्य नगर येथे जया सूर्यवंशी अपंग पती व दोन मुलींसह राहत आहे.
मंगळवार दि.4 मे रोजी सकाळी या परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांना घरात घुसून मारहाण केली. आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड व कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. घराच्या कपाटातील लॉकर तोडून रोख रक्कम, घरातील एलईडी टिव्ही लंपास करण्यात आले.
तसेच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र देखील ओरबडण्यात आले असून, घराची तोडफोड करुन मोठे नुकसान करण्यात आले आहे. अपंग पती शरद सुर्यवंशी यांना देखील जबर मारहाण करण्यात आली. सदर घटनास्थळी पोलीस काही वेळेने आले असता
पोलिसां देखत आरोपी जीवे मारण्याची धमकी देत होते. तरी पोलीसांनी घरात घुसून मारहाण करणार्यांना जाब न विचारता गुपचूप निघून गेले. पिडीत कुटुंबीय दुपारी संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना पोलिस स्टेशन मधून हुसकावून लावले.
संगमनेरचे पोलीस अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी देखील धमकावले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घरात घुसून अपंग पती, महिला व मुलींना जीवघेण्याच्या उद्देशाने मारहाण करणार्या आरोपींवर गुन्हे दाखल करुन, त्यांच्यावर कठोर कारवाई करुन
न्याय देण्याची मागणी आदिवासी भिल्ल समाजाच्या पिडीत कुटुंबीयांनी केली आहे. अन्यथा संगमनेर पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|