त्या विडी कंपनीकडून आगाऊ रक्कम मिळण्यासाठी विडी कामगारांची निदर्शने

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  टाळेबंदीत विडी कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी ठाकूर सावदेकर या विडी कंपनीकडून कामगारांना आगाऊ एक हजार रुपयाची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी लाल बावटा कामगार युनियन (आयटक) च्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

विडी कामगारांना आगाऊ रक्कम न मिळाल्यास 26 मे रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा विडी कामगारांच्या वतीने देण्यात आला आहे.

या आंदोलनात जिल्हा सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, शारदा बोगा, रेणुका अंकारम, अस्मिता बोगा, प्रभावती मेरगू, राजेंद्र सामल, संगीता कोंडा आदी सहभागी झाले होते. 13 एप्रिल पासून पुढे कारखाने बंद आहेत.

विडी कारखान्यांकडून आगाऊ रक्कम मिळण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांना दोन ते तीन वेळेस निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला. राज्य सरकार रिक्षा, बांधकाम, कामगार यांना दीड हजार रुपये अनुदान देत आहे. परंतु विडी कामगार दारिद्र्यरेषेखाली असतानाही त्यांना शासन अनुदान देत नाही.

संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे देखील दीड हजार रुपये प्रत्येक विडी कामगारांना अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मात्र अद्यापि ही मागणी पुर्ण झालेली नसून, विडी कामगारांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी नुकतेच साबळे वाघिरे या विडी कंपनीने विडी कामगारांच्या खात्यात एक हजार रुपये आगाऊ रक्कम खात्यात जमा केली आहे.

ठाकूर सावदेकर या कंपनी व्यवस्थापनाशी बोलून देखील या मागणी संदर्भात कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र सोलापूरमध्ये सदर कंपनीने विडी कामगारांना आगाऊ रक्कम दिलेली आहे.

टाळेबंदी काळात उपाशी राहण्याची वेळ आलेल्या विडी कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी ठाकूर सावदेकर या विडी कंपनीकडून कामगारांना आगाऊ एक हजार रुपयाची रक्कम मिळण्याची मागणी लाल बावटा कामगार युनियन (आयटक) च्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe