अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसही थांबल्या होत्या. आता थोडी शिथिलता आल्याने अनेक भागात बस सुरू करण्यात आल्या आहेत.
अनेक आगारातूनही बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, अपेक्षित प्रवासी नसल्याने बस पूर्ण क्षमतेने धावण्यास असमर्थ ठरत आहे. आगाराचा डिझेलचा खर्च वाया गेला असून, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटी बस ७ जूनपासून पुन्हा धावू लागली. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे,
परंतु अद्यापही हवा तसा प्रतिसाद बसला मिळत नसल्याची माहिती आहे. नगर जिल्ह्यात ११ आगार असून, त्यांच्या सुमारे ७०० बस आहेत. प्रत्येक आगारातून दररोज २५ ते ३० बस सोडल्या जातात. अशा एकूण ३३७ बस सध्या सुरू आहेत.
यात लांब पल्ल्याच्या पुणे, मुंबई, नाशिक अशी वाहतूक सुरू आहे. मात्र, क्षमतेच्या ४० टक्केच प्रतिसाद सध्या मिळत आहे. उर्वरित बसही महामंडळ सुरू करू शकते. मात्र, ग्रामीण भागातून मागणी नाही. अद्याप शाळा-महाविद्यालये बंद आहेत.
ते सुरू झाल्यानंतर काही बस सुरू होऊ शकतात. कोरोनामुळे प्रवासी खासगी वाहनांसह बसमधूनही प्रवास करणे टाळताना दिसुन येत आहेत. स्वतःच्या खासगी वाहनातुन नागरिकांचा प्रवास वाढल्याचे दिसून येत आहे.
मात्र, खासगी वाहनातुन सुरक्षितेची हमी कुणीही देत नाही. बसमधील प्रवास हा सुरक्षित मानला जातो. त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलविण्याची गरज आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम