अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्याला कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. याला तोडण्यासाठी व नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासन अहोरात्र सेवा बजावत आहे.
एकीकडे हे सगळं असताना काही ठिकाणी नागरिक बेफिकिरी सोडायला तयार नाही. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून दररोज बाधितांची संख्या वाढत आहे.
यासाठी अखेर प्रशासन पुढे सरसावले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून, शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची अँटिजन चाचणी करण्याची मोहीम महापालिका व पोलीस प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे.
त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. नगरमध्ये महापालिका आयुक्तांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. सोमवारी दिल्लीगेट, जिल्हा पोलीस अधीक्षक चौक आणि पत्रकार चौकात दुचाकी व चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली.
विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची चाचणी करण्यात आली. चाचणी करण्यासाठी महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारीही चौकात उपस्थित होते.
या कर्मचाऱ्यांकडून अँटिजन चाचणी करण्यात आली असून, पॉझिटिव्ह व्यक्तिंना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
महापालिका व पोलीस प्रशासनाच्या या मोहिमेमुळे रस्त्यावरील गर्दी ओसरली असून, ही मोहीम पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे.
नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम