नगर तालुक्यातील कामरगाव डोंगराला वणवा! नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- नगर तालुक्यातील कामरगाव डोंगराला लागलेल्या वणव्यात मोठे क्षेत्र जळून खाक झाले. त्यात झाडांचे व पशुपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामरगाव येथे रात्री ८  वाजण्याच्या सुमारास गावापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या काहल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जानबाचा तलाव ते भैरवनाथ मंदिर दरम्यान आग लागली.

काही वेळातच या आगीने रूद्ररूप धारण केले.  ही बातमी नवनिर्वाचित सरपंच तुकाराम कातोरे यांना समजली त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली, व त्यांनी गावातील तरुणांना सोबत घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली.

प्रचंड उसळलेला आगडोंब पाहून जंगलातील विविध प्रकारचे प्राणी जीवाच्या आकांताने सैरभैर होऊन पळू लागली हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते.

यावेळी गावातील तरुणांनी ओला बारदाना, झाडांच्या पानांचे डगळे हाती घेऊन,सुमारे तीन तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

तसेच दोन ट्रॅक्टरांनी  आगीच्या पुढे खोल नांगरट केली त्यामुळे आग विझवण्यास आणखी मदत झाली. ही आग आटोक्यात आली नसती तर शेकडो प्राणी व वनस्पती जळून खाक झाल्या असत्या. तसेच शेतकऱ्यांची ज्वारी, गहू, हरभरा आदी उभी पिके जाळून मोठी वित्तहानी झाली असती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News