नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- नाशिक-संगमनेर- पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळेल.

या द्रुतगती रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरु करण्यात येत असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (दि.31) नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भुसंपादनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. नाशिक- पुणे – अहमदनगर हा महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी विकासाचा संपन्न पट्टा आहे. या रेल्वेमार्गामुळे दोन्ही शहरातील दळणवळण वाढून त्याला अधिक गती येणार आहे.

प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमुळे या तीन्ही जिल्ह्यातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा, संगमनेर आणि सिन्नर या भागातील महत्वाचे उद्योग, कृषी केंद्र रेल्वेमार्गामुळे जोडले जाणार आहे. नाशिक – पुणे रेल्वे मार्ग हा देशातील पहिलाच सेमी हायस्पीड मार्ग असणार आहे.

या प्रकल्पासाठी 16 हजार 39 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून 235 कि. मी. ग्रीन फील्ड सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वेमुळे अवघ्या पावणे दोन तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येणार्‍या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. भुसंपादनासह हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून प्रतितास 200 किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe