अहमदनगर – 15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बंधित अनुदानाचा (टाईड) पहिल्या हप्त्यापोटी 1292.10 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे.
यापूर्वी जून 2020 मध्ये सन 2020-21 या कालावधीसाठी नगर जिल्ह्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 85 कोटी 39 लाख रुपये आले होते.

ग्रामपंचायतींसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठीच्या या निधीचे वितरण 80 टक्के ग्रामपंचायत, 10 टक्के पंचायत समिती आणि 10 टक्के जिल्हा परिषद या प्रमाणात तिन्ही स्तरावर करण्यात आले आहे,
त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व 1318 ग्रामपंचायतींच्या वाट्याला 60 कोटी 56 लाख 88 हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.
हा निधी अकोलेतील 146, संगमनेर तालुका 143, कोपरगाव 75, राहाता 50, श्रीरामपूर 52, राहुरी 83, नेवासा 114, शेवगाव 94, पाथर्डी 107, जामखेड 58, कर्जत 91, श्रीगोंदा 86, पारनेर 114, अहमदनगर 105 अशा एकूण 1318 ग्रामपंचायतींना मिळणार आहे.
पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी हा निधी देण्यात येतो. यामुळे गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते.
ही रक्कम जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींच्या बँकेतील खात्यात जमा करण्यात येणार आहे. या अनुदानाचे वाटप ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात येणार आहे