“देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात”; भाजपनेत्याचे विधान

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक धक्कादायक वक्तव्य केले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले,

‘ देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत, अजित पवारांसारखे 100 जण खिशात घेऊन फिरत असतात’. त्यांच्या या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रीपद देऊ नये असा सल्ला मी उद्धव ठाकरेंना दिला होता’ असा गौप्यस्फोट केला.

याला धरूनच पहाटे जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र शपथ घेतली होती. तेव्हा हाच सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिला होता का?असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला होता.

यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “याची गरजच नव्हती. कारण देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात. राज्यात काय चाललय याबाबत उद्धव ठाकरे यांना माहिती नाही.

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका, शिवसेनेने सतत त्रास दिल्यानंतरही महाराष्ट्रात सलग पाच वर्ष ते मुख्यमंत्री राहीले आहेत.

तेव्हा देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु देवेंद्र फडणवीस हे सर्वांना पुरुन उरले.”