अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनाने सर्व गोष्टींवर मोठा परिणाम घडवून आणला आहे. सर्व क्षेत्रातील आर्थिक घडी देखील यामुळे विस्कटली आहे.
कोरोनामध्ये अनेकदा बसप्रवास बंद ठेवण्यात आल्याने महामंडळ अधिक तोट्यात असतानां आता पुन्हा एकदा महामंडळाच्या बसेस समोर एक संकट आले आहे.
जिल्ह्यातील काही एसटी महामंडळाच्या आगारांना डिझेल टंचाईची झळ पोहोचत आहे. नगर जिल्ह्यात एसटीचे ११ आगार आहेत. या सर्वच आगारांमध्ये डिझेलच्या टँकरसाठी एक किंवा दोन दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे.
यातच श्रीरामपूर येथील काही बसेसना प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे तोट्यामध्ये त्या चालविण्यात अर्थ नाही. त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. उत्पन्न नसेल तर डिझेल उपलब्ध होत नाही.
डिझेलचे दर ९५ रुपयांवर गेल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. श्रीरामपूर येथील आगाराला दर दोन दिवसानंतर एका डिझेल टँकरची आवश्यकता भासते. त्यामध्ये १२ हजार लीटर डिझेल भरलेले असते.
त्यापोटी ११ ते १२ लाख रुपये खर्च होतो. मात्र त्या तुलनेत आगाराला उत्पन्न मिळत नाही. श्रीगोंदा येथील आगाराचा इंधन साठा तीन दिवस संपल्यामुळे तेथे ५३ पैकी ४३ बसेस आगारातच उभ्या ठेवण्याची वेळ आली होती. श्रीगोंदा आगाराची स्थिती डिझेलअभावी बिकट झाल्याने कर्जतला त्याचा फटका बसला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम