‘त्या’ गावांत आरोग्य पथकाकडून सर्वेक्षण करा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे या तालुक्यांतील रुग्ण संख्या आढळून आलेल्या

गावांमध्ये तातडीने आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करुन लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची चाचणी करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात तालुकास्तरावरुन कऱण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला.

यावेळी निचित म्हणाले, ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे. त्याठिकाणी संबंधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची आरटीपीसीआर चाचण्या कऱणे, जास्त रुग्णसंख्या आढळून येत असलेला परिसर प्रतिबंधित करणे, लक्षणे आढळून येत असलेल्या व्यक्तींच्या चाचण्या कऱणे आणि कोविड सुसंगत वर्तणूकीची काटेकोर अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.

त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी कार्यवाही करावी. तालुकास्तरीय यंत्रणांनी समन्वय राखून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठीच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे.

कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तालुका यंत्रणांकडून याबाबत ज्या गतीने कार्यवाही आवश्यक आहे, तशी होताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कार्यवाही आवश्यक आहे.

सध्या ज्या भागात अशा कारवाया कमी झालेल्या दिसत आहेत. तेथेच रुग्णसंख्या वाढतानाचे चित्र आहे. त्यामुळे याबाबत सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!