हुंड्यासाठी छळ : नवविवाहितेची आत्महत्त्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- २१ व्या शतकात आपण खूप प्रगती केली असे म्हणतो. मानवाने अंतराळात पाऊल ठेवले आहे. मात्र आजही समाजात हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ केल्याचे आपण पाहतो.

यात अनेक मुली आपल्या वडीलांची आर्थिक परिस्थिती नसल्याने तसेच रोज होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्त्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात.

अवघ्या सात महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहितेच्या वडीलांकडून हुंड्याचे राहिलेले २० हजार रुपये व दुचाकी घेण्यासाठी ३० हजार रुपये घेऊन ये,

असे म्हणत एका नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा नोंद झाला. कोमल सोमनाथ पडुळकर (१९, रा.वडसावित्रीनगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

सात महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. याबाबत सविस्तर असे की, दि . १९ जून रोजी सकाळी सहा वाजता अंगणात सडा टाकण्यासाठी शेण आणायला जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली, त्यानंतर परतलीच नाही.

सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे त्याच दिवशी कुटुंबीयांनी शहर ठाण्यात बेपत्ताची तक्रार नोंदवली. दरम्यान, वडसावित्रीनगर परिसरातीलच एका विहिरीतील पाण्यावर तिचा मृतदेह तरंगत असल्याचे मंगळवारी आढळून आले.

याप्रकरणी मयत कोमलचे वडील संजय पवार (रा.आडस ता.केज) यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांत पती सोमनाथ पडुळकर, सासरा बाळासाहेब पडुळकर, सासू मंगल पडुळकर आणि नणंद उषा चव्हाण यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe