अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- पोलिसांच्या आक्रमक कारवायांमुळे कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील सावकारांनी या मोहिमेचा चांगलाच धसका घेतला आहे.
कर्जत तालुक्यामध्ये गेल्या तीन-चार महिन्यात सावकारांविरुद्ध कित्येक गुन्हे दाखल करून तर काही प्रकरणे तडजोडीने मिटवून कोटी रुपयांची सक्तीची वसुली थांबवली आहे.
सावकार पीडित कुटुंबांना न्याय देण्यासाठी डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी कर्जत विभागात सावकारविरोधी मोहीम राबवली. पोलीस प्रशासनाच्या वतीने पीडितांना न्याय मिळवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
त्याचा चांगला परिणाम झाला. गेल्या तीन- चार महिन्यात सावकारांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक सावकारांना जेलची हवा खावी लागली. कर्जत तालुक्यात ५ तर जामखेडमध्ये ३ गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांकडून ६ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. यातून कोटी रकमेची सक्तीची वसुली थांबवण्यात आली. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हाताला काम मिळाले नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.
सावकाराने मात्र ४५ टक्क्यांपर्यंत व्याज आकारून सक्तीची वसुली सुरू केली. धमकी आणि मारहाण करून बेकायदेशीररित्या लिहून घेतलेली मालमत्ता ताब्यात घेण्याचा सपाटा लावला.
पोलीस विभागाच्या खमक्या भूमिकेमुळे पीडितांना न्याय मिळाला. सावकाराने हिरावून घेतलेले कौटुंबिक स्वास्थ्य पोलिसांच्या कार्यतत्परतेने परत मिळाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम