अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- येथील श्रीरामपूर नगरपरिषदेची ई-लायब्ररी बंद पडली आहे. केवळ उत्पन्न मिळत नाही, म्हणून ई-लायब्ररीच्या टेंडरचे नूतनीकरण केले नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
आठ दिवसाच्या आत ई-लायब्ररी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे,
श्रीनिवास बिहानी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, रितेश रोटे, मनोज लबडे, प्रवीण नवले, लक्ष्मण कुमावत, सुहास परदेशी, रितेश एडके यांनी ई-लायब्ररीस सोमवारी भेट दिली.
यावेळी लायब्ररी बंद असल्याचे समोर आले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी सांगितले, की सन २०१३ साली दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते या लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले होते.
ही उत्पन्न देणारी इमारत नसून त्या ठिकाणी अल्प दरात विद्यार्थ्यांना शिकण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र सध्या या लायब्ररीतील सर्व्हर रूममधील सर्व्हरचा काही भाग गहाळ झालेला असून, इन्वर्टर, बॅटरी अक्षरश: धूळखात पडून आहेत.
नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना मुळातच सर्वसामान्यांचे शिक्षण, त्यांच्या अडचणी याबाबत काहीच माहिती नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
केवळ माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेली वास्तू म्हणून जाणून बुजून ई-लायब्ररी हा उपक्रम बंद पाडण्याचा त्यांचा हेतू आहे.
मात्र ई-लायब्ररी बंद पाडण्याचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे उपनगराध्यक्ष ससाणे यांनी सांगितले. आठ दिवसाच्या आत ई-लायब्ररी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|