खा. उदयनराजे म्हणतात, महावितरणने जनतेला दिलासा न दिल्यास ‘हे’ अटळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-  लॉकडाउन, अनलॉक यांचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यापासून गेले वर्षभर बहुतांश सर्व क्षेत्रातील व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

अशा स्थितीत, वीज बिलांच्या थकबाकीमुळे वीज तोडण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे. कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देऊन चांगले काम केले आहे. त्यामुळे वीज तोडण्याची कारवाई वेदनादायी आहे. ग्राहकांना टप्याटप्याने थकबाकी भरण्याची सवलत देऊन महावितरणने जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे,

असा इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. खा. उदयनराजे म्हणाले, महावितरण कंपनी देशात अग्रेसर आहे. कोरोना काळातदेखील कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अखंड वीजपुरवठा केला. महाराष्ट्राच्या गरजेपैकी जवळपास निम्मी वीज सातारा जिल्ह्यात तयार होते, ही वस्तुस्थिती आहे.

कोरोनामुळे कौटुंबिक गरजा भागवताना सर्वांची तारेवरची कसरत होत आहे. बहुतांश शैक्षणिक कार्य ऑनलाइन सुरू आहे. वीज नसेल तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात वीज बिलांचे वाटप करण्यात आले नाही. तीन-चार महिन्यांची वीज बिले एकत्रित देण्यात आली.

ती भरताना नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. एकत्रित वीज बिलांमुळे एकूण युनिटस्‌ वाढून जादा युनिटचा दर लावण्यात आला. यामध्ये वीज ग्राहकांचे दुहेरी नुकसान झाले आहे. या स्थितीत थकीत वीज बिले टप्याटप्याने भरण्याबाबत धोरणात्मक निर्णय कंपनीने घेतला पाहीजे.

कोरोना काळात थकबाकीमुळे वीज कनेक्‍शन तोडणे कदापि मान्य करता येणार नाही. अशा वेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजूने ठाम उभे राहू. कारवाईत कोणाकोणाची वीज तोडली, त्याचा आढावा घेऊन जागेवरच सोक्षमोक्ष लावताना संघर्ष अटळ ठरेल, असा इशारा खा. उदयनराजे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe