अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- विवाहबाह्य संबंधाला अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या पतीला झोपेच्या गोळ्या खाण्यास देऊन नंतर त्याचा झोपेत खून केल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी देवाची येथे घडला.
पत्नी आणि प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पत्नी अश्विनी मनोहर हांडे (१९, रा. उरुळी देवाची) आणि गौरव मंगेश सुतार (रा. उत्तमनगर, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मनोहर हांडे (२७, रा. उरुळी देवाची) याचा खून करण्यात आला.
पोलिस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांनी याबाबत फिर्याद दिली. अश्विनी गृहिणी, गौरव कंपनीत, तर मनोहर सिव्हिल इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. अश्विनीचे आणि गौरवचे सातवीपासूनच प्रेमसंबंध होते. बारावीपर्यंत दोघे एकत्र शिकत होते.
याचदरम्यान अश्विनीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह तिच्या मामाचा मुलगा असलेल्या मनोहर हांडे याच्याशी जानेवारी २०२१ लावून दिला. विवाह झाला असताना अश्विनी-गौरवचे प्रेमसंबध सुरूच होते. मनोहर गुन्हा घडण्यापूर्वीच्या १५ दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह असल्याने घरीच उपचार घेत होता.
परंतु, गौरवबरोबर असलेल्या संबंधाच्या कारणावरूनच पती-पत्नीमध्ये जोरदार भांडणे झाली. याच रागातून गौरवने तिला झोपेच्या गोळ्या नेऊन दिल्या. सुरुवातीला त्याला चहातून गोळ्या देऊनही त्याच्यावर गोळ्यांचा काहीही परिणाम झाला नाही.
त्यामुळे २३ मे रोजी गौरवने अश्विनीला पुन्हा झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. त्या गोळ्या तिने मनोहरला दुधातून दिल्या. मनोहर झोपी गेल्यानंतर मध्यरात्री गौरव त्यांच्या घरी आला. दोघांनी मिळून मनोहरचा तोंड व गळा दाबून खून केला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम