अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- राज्य सरकारने कोरो नाच्या नावाखाली शेतकर्यांना वार्यावर सोडून दिले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना मदत न करणार्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा पर्दाफाश करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषि क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सुरु केलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचा. असे आवाहन भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्यावतीने उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकार्यांचा मेळावा आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकरी हाच केंद्रीभूत मानून घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत.
कोरोनाच्या संकटातही अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न झाल्यामुळेच देशाचा कृषि विकासदर चांगला आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशातील कृषि क्षेत्रासाठी क्रांतीकारी पर्व सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ११ कोटी शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत.
आजपर्यंत ८४ हजार कोटी रुपयांच्या योजना देशभरात शेतकर्यांसाठी सुरु झाल्यामुळेच कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार मात्र कोरोना संकटाच्या नावाखाली हात बांधून बसले आहे. केवळ लॉकडाऊनचे निर्णय करुन या सरकारने जनतेला त्रस्त केले.
कवडीचीही मदत हे सरकार करु शकले नाही. राज्यात लसीकरण झाले ते सुध्दा प्रधानमंत्र्यांनी मोफत लस उपलब्ध करुन दिल्यामुळेच. तुम्ही राज्यातील शेतकर्यांना काय दिले? असा सवाल उपस्थित करुन आ.विखे पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी किसान मोर्चाला आता पार पाडावी लागणार आहे.
आघाडी सरकारचे अपयश लोकांमध्ये जावून तुम्हाला सांगावे लागेल. एकीकडे तीन पक्षांचा आवाज आहे तर दुसरीकडे भाजप म्हणून आपला आवाज लोकांमध्ये जावून मजबुत करावा लागेल. केंद्र सरकारच्या योजनांची माहीती शेतकर्यांच्या बांधावर जावून द्या. यासाठी किसान मोर्चाची संवाद यात्रा सुरु करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम