अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-जळगाव जिल्हा हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेला आहे.अनेक लोकांचा रोज त्यात जीव जात आहे. रुग्णालये फुल्ल झाले असून बेड मिळत नाही.
मात्र याच जिल्ह्यात लोकांनी वापरुन फेकून दिलेल्या मास्कपासून गादी बनवण्याचा उद्योग एकाने सुरू केला आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा धक्कादायक प्रकार रविवारी जळगाव शहरातील कुसुंबा नाका येथे उघडकीस आला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अमजद अहमद मन्सुरी (रा. आझादनगर) यास अटक केली आहे.
जळगाव जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन लाॅकडाऊन लागू करीत असताना मन्सुरी याने कुसुंबा नाक्याजवळ हॉटेल कृष्णा गार्डनच्या मागे लोकांनी वापरून फेकून दिलेल्या मास्कपासून गादी तयार करत होता.
याची माहिती कुसूंबा येथील पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिध्देश्वर डापकर, शांताराम पाटील यांनी मन्सुरी याचे दुकाने गाठले.
तेथे नागरिकांनी वापरलेल्या मास्क पासून गादी बनविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मास्क पडलेले दिसून आले.
याबाबत मन्सुरी यास विचारले असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मालक अमजद मन्सुरी याच्या विरोधात कोरोनाचा संसर्ग वाढवून नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|