अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-कोपरगाव येथील महिला नगरसेविकांचे पती व काही नगरसेवक तसेच नगर परिषदेचे पदाधिकारी यांच्या जाचक त्रासाला कर्मचारी कंटाळले आहे.
नगरसेवकांकडून सतत कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप होत असून, हे पदाधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. याला नगर परिषदेतील कर्मचारी वैतागून गेले आहे.
या गोष्टींना विरोध म्हणून तब्बल 190 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. १०) सायंकाळपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला.
या संदर्भात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान या दिलेल्या निवदेनात म्हंटले आहे कि, एका नगरसेवकाने एका अधिकाऱ्याला अरेरावीची भाषा वापरली तसेच अपमानास्पद वागणूक दिली.
नगर परिषदेच्या कामकाजाची एक प्रक्रिया असते. प्रत्येक कामकाज पारदर्शीपणे राबविले जाते. परंतु, काही नगरसेवकांनी प्रत्येक विभागाला दमदाटी करून कामे करून घेण्याचा पायंडाच पाडला आहे.
यातून महिला अधिकार्यांनाही हीनतेची व अपमानास्पद वागणूक दिली जाते. काही नगरसेवक तर आमच्यावर गुन्हे दाखल आहेत, आम्ही काहीही करू शकतो, अशा धमक्या देतात.
या दमदाटीला प्रत्येक अधिकारी, कर्मचारी वैतागला आहे. त्यामुळे नगरसेवकांकडून जोपर्यंत सन्मानाची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत नगर परिषदेचे कामकाज कामबंद आंदोलन करून बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved