अखेर ठरलं ? खा.सुजय विखेंच्या विरोधात राणी लंके ! हालचालींना वेग, पडद्यामागे मोठ्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणूक अगदीच समोर आलेल्या असून येत्या २८ मार्चपासून उमेदवारी अर्ज देखील भरण्यास सुरवात होईल. असे असले तरी अहमदनगर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. एकीकडे भाजपने खा. सुजय विखे यांच्या नावाची घोषणा केली आहे परंतु त्यांच्या विरोधातील उमेदवारच अद्याप फिक्स झाला नाही.

सध्या विखे यांच्या विरोधात आ. निलेश लंके अशीच लढत होईल अशा केवळ चर्चा आहेत. परनु तांत्रिक अडचणींचा खेळ अद्याप सुटलेला नसल्याने आ. निलेश लंके यांची उमेदवारी अद्याप तरी फिक्स होताना दिसत नाही. सध्या निलेश लंके यांच्याऐवजी राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी घडामोडी सुरु असल्याचे चर्चा आहेत.
पक्षविरोधी कारवाई व अमपात्रतेची टांगती तलवार
आ. निलेश लंके यांनी जर शरद पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला तर अजित पवार गट त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करू शकते. त्यासाठी त्यांना आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे सध्या त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई व अमपात्रतेची टांगती तलवार असल्याने ते सध्या राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याच्या चर्चा आहेत.
जनसंपर्क अभियान राबवण्याच्या चर्चा
पक्षविरोधी कारवाई टाळण्यासाठी आ. लंके यांनी राणी लंके यांची उमेदवारी मागितली असल्याच्या चर्चा असतानाच आता मंगळवार, दि. १ एप्रिलपासून आ. लंके हे त्यांच्या प्रतिष्ठानच्या मार्फत नगर लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क अभियान राबविणार असल्याच्या चर्चा आहेत.
पवार गट निलेश लंके यांच्यासाठी आग्रही ?
शरद पवार गट मात्र आ. निलेश लंके यांच्या उमेदवारीबाबत आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे. राणी लंके यांना उमेदवारी नाकारून ते केवळ निलेश लंके यांनाच उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सध्या आहेत.