शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोविड सेंटरला दीड लाखाची आर्थिक मदत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात विविध जबाबदारी स्विकारुन शिक्षकांची तन, मन व धनाने सेवा सुरु आहे. 1 व 2 जून रोजी असलेल्या शासकीय वाढदिवसाचे औचित्यसाधून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी एकत्र येत आपल्या वाढदिवसानिमित्त तब्बल दीड लाखची मदत जमा करुन निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा देणार्‍या कोविड सेंटरला आर्थिक मदत देण्यात आली.

आप्पासाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या संकटकाळात आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा हा दिवस सत्कारणी लागण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून तब्बल दीड लाख रुपये जमा केले.

तर कोविड सेंटर सारख्या आरोग्य मंदिराच्या रुपाने दीन, दुबळे व गरजू घटकातील कोरोना रुग्णांवर निस्वार्थपणे उपचार करणार्‍या कोविड सेंटरला आर्थिक मदत देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

माऊली सेवा प्रतिष्ठान संचलित देहरे (ता. नगर) येथील मनगाव प्रकल्पात सुरु असलेल्या मनोरुग्णांच्या कोविड सेंटरला 51 हजार रुपये, भाळवणी येथील शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटरला 50 हजार रुपये तर जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरला 50 हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले.

मदत वाटपाचे प्रारंभ मनगाव प्रकल्पात सुरु असलेल्या मनोरुग्णांच्या कोविड सेंटरपासून करण्यात आली. मनगाव प्रकल्पाचे डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचेता धामणे, निलम लोखंडे व मोनिका साळवे यांनी या मदतीचा स्विकार केला.

यावेळी आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे, नंदकुमार शितोळे, शिवाजी नरसाळे, उध्दव सोनवणे, रामलाल कर्डिले, रावसाहेब चौधरी, राजेंद्र लोहकरे, बाबासाहेब पवार, देवीदास पालवे, अशोक कांडके, विकास थोरात, राहुल कांडके, चंद्रकांत कांदळकर, सुनिल विधाटे, गणेश हारेर आदी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले की, शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. या कोरोनाच्या संकटकाळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी देखील उत्तमपणे योगदान दिले. अनेक शिक्षक कोरोना महामारीत गमावले गेले.

या संकटकाळात शिक्षकांनी दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तर मनगाव प्रकल्पात राज्यातील पहिलेच मनोरुग्णांचे कोविड सेंटर सुरु असून, कोरोना झालेल्या मनोरुग्णांवर सुरु असलेल्या कोरोना उपचाराची माहिती दिली.

बेवारस मनोरुग्णांचे हक्काचे घर असलेल्या मनगाव प्रकल्पाचे कार्य पाहून शिक्षक भारावले. आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा सुरु असलेली कोविड सेंटर आरोग्य मंदिर आहेत. या आरोग्य मंदिरांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे.

या संकटकाळात वाढदिवस साजरा करण्यापेक्षा इतरांना मदत देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या महामारीत माणुसकीच्या भावनेने एकमेकांना आधार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe