अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतच्या स्ट्रीट लाईटचे तोडलेले कनेक्शन तातडीने जोडावीत अन्यथा मोठे जनआंदोलन हाती घेऊ.
हाेणाऱ्या दूष्परिणामास राज्य सरकार व वीज वितरण विभाग जबाबदार राहील, असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला. वीज वितरण अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत निवेदन दिले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे, तालुका सरचटणीस भाऊसाहेब वाकचौरे,
यशवंत आभाळे, सुधाकर देशमुख, मच्छिंद्र मंडलिक, सरपंच बाबासाहेब उगले, सरपंच डॉ.रवींद्र गोर्डे आदींसह अनेक कार्यकर्ते, सरपंच ग्रा.प.सदस्य उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीचे स्ट्रीटलाईट वीजबिल आजपर्यंत जिल्हा परिषद भरते.
मात्र आता पहिल्यांदा ग्रामपंचायतीला बिले आली असून पंधराव्या वित्त निधीतून याची तरतूद करा, असे वीजवितरण कंपनी सांगते. मात्र असा कुठलीही आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेला नाही.
वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन ताेडल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सध्या तालुक्यातील अनेक गावांत बिबट्याचा वावर वाढला असून नुकताच धुमाळवाडी येथील शिवारात बिबट्याने एका तरुण युवकावर हल्ला करून त्याला ठार मारले.
रात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी भरायला जावे लागत आहे. बिबट्याच्या दहशतीने सर्व नागरिक, शेतकरी घाबरले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम