बोधेगावला पोलीस ठाणे कार्यान्वीत करावे माजी सभापती हर्षदाताई काकडे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- शेवगाव तालुक्यातील व्यापारी दृष्टिकोनातून प्रमुख गाव असलेल्या बोधेगावला पोलीस ठाणे कार्यान्वीत करण्याच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जि.प. महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदाताई काकडे यांनी दिले.

अहमदनगर पोलीस मुख्यालय येथे श्री साई तिर्थक्षेत्र (पर्यटन) पोलीस मदत केंद्र व डीपीडीसी मधून पोलीसांसाठी चारचाकी वाहन प्रदान कार्यक्रमाप्रसंगी हर्षदाताई काकडे यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन सदर निवेदन दिले. तर बोधेगावच्या पोलीस ठाणे निर्मितीबद्दल चर्चा केली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक) प्रतापराव दिघावकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते. बोधेगावाची हद्द ही बीड व औरंगाबाद जिल्ह्यालगत आहे. शेवगाव पासून तब्बल पाऊण तासाच्या अंतरावर असलेले बोधेगाव व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. या ठिकाणी पोलीस ठाणे उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, याबाबतचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आलेला आहे.

बोधेगाव पोलीस ठाण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा आहे. बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे झाल्यास तेथे स्वतंत्र कर्मचारी वर्ग मिळेल. भौगोलिक दृष्टया सर्वात मोठा जिल्हा असल्याने अशा गावात पोलीस ठाण्याची गरज भासत आहे. या भागात गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांचा वावर वाढल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुढे येत आहे.

या भागात साखर कारखाना, शाळा, महाविद्यालय, मोठ-मोठे दुकान व विविध आस्थापनांचे कार्यालय आहेत. लोकसंख्या वाढीमुळे पूर्व भागातील प्रमुख गाव असल्याने या भागात पोलीस ठाण्याची नितांत गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या भागातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीने पोलीस ठाणे कार्यान्वीत करण्याची मागणी बोधेगाव ग्रामस्थांच्या वतीने काकडे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe