अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे काल कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर मागील 23 दिवसांपासून उपचार सुरू होते.
काल त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर कालच त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. एक तरुण, आश्वासक नेता अकाली गेल्यामुळे सार्वत्रिक हळहळ व्यक्त होत आहे. सातव यांच्यावर आज, सोमवारी सकाळी मसोड (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार झाले.
राजीव सातव यांच्या मुळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते व राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. सातव यांच्या निधनाने हिंगोलीतील अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
कळमनुरी येथे काँग्रेसचे नेते नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री बंटी उर्फ सतेज पाटील, अमर राजूरकर यांनी खासदार राजीव सातव यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले.
यावेळी परिवारातील सदस्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले अन परिवाराचा आश्रूंचा बांधच फुटला. यावेळी उपस्थितांनीही एकच हंबरडा फोडल्याने वातावरण गंभीर झाले. खासदार सातव यांचे पार्थिव कळमनुरीत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी रात्री मोठी गर्दी केली आहे.
त्यांचे पार्थिव आज सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, माजीमंत्री सातव, डॉ. सातव, मुलगा पुष्कराज, मुलगी युवराज्ञी,
प्राचार्य बबन पवार यांनी अंत्यदर्शन घेतांना आश्रूंना वाट मोकळी करून दिली. एकीकडे आई व दुसरीकडे वयोवृध्द आई यांना सावरण्यासाठी पुष्कराज पुढे आला. त्यांनी दोघींनाही सावरले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम