अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- बळीराजासाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाने मोठा खंड दिला होता. पावसाळा सुरू झाल्यापासून या भागात जोरदार पाऊस झाला नव्हता.
यामुळे येथील शेतकरी चिंतेत होते. परंतु आता पुढील दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 17 आणि 18 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भासाठी १८ ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमाल आणि किमान तापमानात विदर्भात काही बदल होणार नाहीत. जिल्ह्यातील काही भागात तापमान 35-36 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहू शकते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम