अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- महाराष्ट्रात अनलॉक सुरू झाला असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अस्थापने, दुकाने खुली करण्यात आली आहेत. तरी महाराष्ट्र सरकारने धार्मिक व पर्यटन स्थळे तात्काळ खुली करावी, अशी मागणी शिर्डी शहरातील उद्योजक मनोज रतीलाल लोढा व सतीश गंगवाल यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात लोढा व गंगवाल यांनी म्हटले, की शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होण्याची गरज आहे. साईसमाधी मंदिर ५ एप्रिलपासुन भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. फक्त १५ महिन्यात दोन महिने मंदिर सुरू होते.
त्यामुळे शिर्डी व राहाता तालुक्यातील अर्थकारण अडचणीत आले आहे. गाळे भाडे, कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? इंधनाचे वाढलेले दर, बेरोजगारी यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. कोरोना रुग्णांची होणारी घट समाधानाची बाब मानली पाहिजे.
महाराष्ट्रामध्ये धार्मिक व पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळत असतो. त्याला साई मंदिरदेखील अपवाद नाही. त्यासाठी शिर्डी शहरात दर्शनासाठी साईभक्तांची संख्या वाढली, तरच या परिसरात अर्थकारण गतीमान होऊ शकते.
यासाठी शासनाने नियमाला अधीन राहून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे लगतच्या काळात कशी सुरु होतील, यासाठी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी लोढा व गंगवाल यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम