जगभरात बालकांमध्ये स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. चीनने ही गोष्ट लक्षात घेत चिमुकल्यांमधील स्मार्टफोनचे व्यसन कमी करण्यासाठी आता नवीन मसुदा तयार केला आहे.
त्यानुसार बालकांना दिवसातून जास्तीत जास्त दोन तास मोबाईल वापरण्याची मुभा दिली जाणार आहे. हे नियम कधीपासून लागू होतील, हे निश्चित नाही. पण यामुळे सोशल मीडिया व ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
चीनच्या सायबर स्पेस प्रशासनाने (सीएसी) आपल्या संकेतस्थळावर यासंबंधीचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार बालकांना रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत मोबाईलवर इंटरनेट सेवा वापरता येणार नाही. तर १६ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना दिवसातून फक्त दोन तास इंटरनेटचा वापर करता येईल.
८ ते १५ वयोगटातील मुला-मुलींना दिवसातून फक्त एक तास स्मार्टफोन वापरण्याची मुभा असेल, तर ८ वर्षांखालील मुलांना फक्त ४० मिनिटांसाठी स्मार्टफोन वापरता येणार आहे. अल्पवयीन मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या अॅप व व प्लॅटफॉर्मला या नियमांमधून सूट देण्यात आली आहे.
पण नेमक्या कोणत्या इंटरनेट सेवांना सूट दिली जाईल, हे स्पष्ट करण्यात आले नाही. नव्या मसुद्यावर २ सप्टेंबरपर्यंत लोकांचे मत मागवण्यात आले आहे. युवकांमध्ये वाढत चाललेले इंटरनेटचे वेड कमी करण्यासाठी चीनकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये चीनने मुलांना दिवसातून फक्त ९० मिनिटे ऑनलाइन गेम खेळण्याची मुभा दिली होती. वर्ष २०२१ मध्ये हे नियम आणखी कठोर करण्यात आले. त्यानुसार मुलांना शुक्रवारी, आठवड्याच्या अखेरीस आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीच फक्त ६० मिनिटे ऑनलाइन गेम खेळण्याची परवानगी देण्यात आली. ताज्या मसुद्यामुळे ऑनलाइन गेम आणि शॉर्ट व्हिडीओ क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. मसुदा जारी करताना या कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात कोसळल्याचे चित्र दिसून आले.