Old Pension Scheme :- राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व शिक्षक, शिक्षकेतर जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या सर्व कामगार संघटना कर्मचाऱ्यांसह पीएफआरडीए कायदा रद्द करावा व सर्वांना जुनी पेन्शन मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ३) दिल्ली येथील रामलीला मैदान ते संसद भवन पर्यंत होणाऱ्या देशव्यापी रॅलीसाठी जाणार आहे.
या रॅलीत जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील कर्मचारी सहभागी होवून हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न शील राहणार असल्याची माहिती समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर शाखेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे व अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली आहे.

दिल्ली येथे राज्य व केंद्रीय कर्मचारी रामलीला मैदानावर एकत्र येऊन संसद भवनावर मोर्चाने काढणार आहेत. नुकतीच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा अहमदनगर यांची वार्षिक सभा पार पडली.
या सभेमध्ये २१ सप्टेंबर रोजी मुंबई येथील झालेल्या मीटिंगच्या आदेशाने २९ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर आदी कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे राज्य शासनाने जुनी पेन्शन करिता नेमलेल्या समितीने सहा महिने होऊनही अद्याप निर्णय घेतलेला नाही.
मुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन पाळलेले नाही. राज्य सरकारकडून सकारात्मक हालचाली होत नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे सांगण्यात आले आहे. मध्यवर्ती संघटनेच्या झालेल्या बैठकीप्रसंगी समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिल्ली येथील आंदोलनानंतर ८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन संपाच्या नोटीसचे निवेदन दिले जाणार आहेत. यानंतर शासनाने दखल घेतली नाही तर १४ डिसेंबर रोजी कर्मचारी शिक्षक पुन्हा संपावर जाणार असल्याचा इशारा राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.