स्व.अनिलभैय्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसच्यावतीने अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  नगर शहरातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातली ताईत असणारे स्व. अनिलभैय्या यांच्या निधनाला एक वर्ष झाले. मात्र आजही ते आपल्यात आहेत अशी अनुभूती कायम सामान्य माणसांना मिळत असते. सर्वसामान्यांच्या हिताच्या रक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

नगर शहरातील काँग्रेस ही स्व.अनिलभैय्या यांनी दाखवलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याच्या विचारांवर कायम काम करीत राहील, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केले आहे. स्व. अनिलभैय्या यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवालयामध्ये जाऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी काळे बोलत होते.

यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, सावेडी शिवसेना प्रमुख काका शेळके, विशाल वालकर, अविनाश धनगर आदी उपस्थित होते.

किरण काळे यावेळी बोलताना म्हणाले की, सर्वसामान्य माणसाने रात्री अपरात्री केव्हाही अनिलभैयांना फोन केला तरी त्यांच्या मदतीला धावून जायचे. आपण फोन केला तर तो फोन उचलला जाईल आणि भैय्या लगेच उपस्थित होतील असा विश्‍वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये होता. या शहरातील व्यापारी, उद्योजक, हातगाडीवाला, फेरीवाला, भाजीवाला अशा कोणत्याही सामान्य घटकाला त्यांनी कधीही त्रास दिला नाही.

त्यांनी कायम दहशतीच्या विरोधात संघर्ष करत या शहराला संरक्षण देण्याचे काम केले. स्व.अनिलभैय्या यांच्यामुळे नगर शहरातील सामान्य जनतेची पिळवणूक करणाऱ्या, दहशत करणाऱ्या घटकांवरती मोठा वचक होता. त्यांच्या निधनानंतर हा वचक आता राहिला नाही. शहराला कुणी वाली उरला नाही अशी भावना या शहरातील अपप्रवृत्तींचा मनामध्ये दुर्दैवाने निर्माण झाली.

त्यामुळे अनिल भैय्या आपल्यात नसण्याची उणीव शहराला यामुळे सतत जाणवत असते. एक पोरकेपणाची भावना नगरकरांच्या मनामध्ये आहे. अनिलभैय्या शरीराने जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार जिवंत राहण्याची गरज आहे. म्हणूनच शहरातील काँग्रेस त्यांच्या विचारांवर काम करीत असून कायम या विचारांची जपणूक करण्यासाठी काम करेल, असे यावेळी काळे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe