अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आॉक्सिजनची पुरेशी उपलब्धता, रुग्ण बेड संख्या वाढविणे, ग्रामिण रुग्णालयांचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करणे, जिल्हयात चौदा ठिकाणी आॉक्सिजन प्लँट स्थापन करण्यासोबत विविध उपाययोजनांची तयारी केली असून नागरिकांनीसुद्धा लसीकरण करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्राम विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जामखेड येथे केले.
कर्जत-जामखेड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी जामखेड येथील राज लाॅन्स येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. रवी आरोळे, डॉ. शोभा आरोळे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट तिव्र असणार आहे.
या लाटेत आतापर्यंतच्या रुग्णापेक्षा चौपट रुग्ण वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासोबतच वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. तिसर्या लाटेमुळे जास्त नुकसान न होण्यासाठी जवळपास सत्तर टक्के नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत आमदार रोहित पवार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेले कार्य कौतुकास्पद असून त्याचे अनुकरण सर्वांनी करावे असे त्यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी यांनी भरीव सहकार्य केल्यामुळे कोविड रुग्णसंख्या कमी झाल्याचे प्रतिपादन केले. कोविड उपाययोजनांसाठी आमदार निधीतून सुमारे दिड कोटी रुपये खर्च केला असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्यातील लसीकरण नियोजनबध्द पध्दतीने केल्याचे सांगून लसींचा पुरवठा वाढविण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर जिल्हयात रुग्णसंख्या वाढली असली तरी पाॅझिटिव्हीटी रेट कमी असल्याचे सांगितले. कोरोना घालवायचा असल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी कोरोना सद्यस्थिती आणि प्रशासनाने केलेल्या कार्याची माहिती आढावा सादर करताना दिली.
कोविड रुग्णांवर मोफत उपचार करून निस्वार्थी आरोग्य सेवा दिल्याबद्दल जामखेड येथील आरोळे हाॅस्पीटलचे डॉ. रवी आरोळे आणि डाॅ. शोभा आरोळे यांचा यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
आॉक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि कोविड आॉक्सिजन बेड आरोग्य केंद्राचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तेवीस कोटी रुपये खर्चून बांधलेल्या लिक्विफाईड मेडिकल आॉक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा आणि आरोग्य केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. या सुविधांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना कोविड उपचारासाठी शहरात येण्याची आवश्यकता भासणार नाही असे पालकमंत्री यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम