लसीकरणामध्ये गुरुजी ठरले अग्रेसर; जिल्ह्यात ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू केल्यानंतर आता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शासनस्तरावर तयारी सुरू आहे.

त्याअनुषंगाने ५ सप्टेंबरपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे नगर जिल्ह्यात ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे शाळा सुरु करण्याच्या दिशेने लवकरच एक सकारात्मक पाऊल पडणार असे दिसून येत आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत तीव्र गतीने सुरु आहे. यातच कोरोनामुळे शाळा अनेक महिन्यांपासून बंद आहे. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने प्रथम इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. नगर जिल्ह्यात आठवी ते बारावी पर्यंतच्या १९५ शाळा सुरू झाल्या आहेत.

आता कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शासन विचार करीत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू होताना शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले आहे.

जिल्हा परिषद व इतर व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९० टक्के शिक्षकांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे. १० टक्के शिक्षकांचे लसीकरण बाकी आहे. हे राहिलेले लसीकरण ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसे आदेशच शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe