अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने शहरातील शिक्षकांनी शाळेत काळ्या फिती लाऊन कामकाज केले. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण कराव्या, यासाठी घोषणा देण्यात आल्या. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघटनेमार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शिक्षक परिषदेने एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात सहभागी होऊन शहरातील शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी काळ्या फिती लाऊन कामकाज केले.
नेमक्या काय आहेत शिक्षकांच्या मागण्या ? जाणून घ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना दहा, वीस, तीस वर्ष सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करावी, करोनाग्रस्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना विशेष रजा व प्राधान्य अनुकंपा योजना लागू करावी,
राज्यातील कार्यरत सुमारे 20 हजार टीईटी ग्रस्त शिक्षकांना सेवा संरक्षण देऊन व त्यांचे पवित्र पोर्टलमध्ये अपग्रेडेशन करून मुलाखतीची संधी द्यावी, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्यांना विनाविलंब पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेले शिक्षक कर्मचार्यांना शिक्षण कायदा 1977-1978 नुसार लागू झालेली सेवाशर्ती नियमानुसार 1981 मधील नियम 19 व 20 नुसार जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना पूर्ववत लागू करावी,
संगणक शिक्षकांना पूर्ववत सेवेत रुजू करून सेवा संरक्षण देण्यात यावे, नियुक्ती, मान्यता प्रकरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या 59 शिक्षणाधिकार्यांविरुद्ध कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी आदी शिक्षण क्षेत्रातील विविध 31 मागण्या पूर्ण करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम