अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या संदर्भात पोलिसांचा तपास प्रगतीपथावर आहे. गावाचे नाव सांगणे योग्य नाही, पण तो कुठे आहे, याची माहिती मिळाली आहे, असे सूचक वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. दरम्यान, मुश्रीफ यांच्या या सूचक वक्तव्यामुळे बोठेचा सुगावा लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रेखा जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी बोठे सापडत नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने त्यांनी आज अहमदनगर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
गेल्या अडीच महिन्यांपासून आरोपी बोठेचा तपास लागायला तयार नाही. कालच मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असून उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे, असे जरे यांनी यावेळी सांगितले. निवेदनामध्ये सर्व बाबींचा उल्लेख करण्यात आल्याचेही त्यांनी मुश्रीफ यांना सांगितले.
यावेळी रुणाल जरे यांच्याशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, रेखा जरी हत्याकांडाच्या तपासात मी पूर्ण लक्ष घातले आहे. दर आठवड्याला माझी पोलीस अधीक्षक मनोज पाटील व विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्याशी चर्चा होते.
पोलिसांचे तपासाचे काम गंभीरपणे सुरू आहे. जे करता येणे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. तसेच आपल्याकडे यासंदर्भातील पुरावेही भक्कम आहेत. त्यातून आरोपीची सुटका होणार नाही व तुलाही न्याय मिळेल.
लवकरात लवकर आज ना उद्या तो सापडेलच व त्याला सजा मिळेलच, असा दावा करून मुश्रीफ म्हणाले, तो जितका पळेल तितक्या त्याच्या अडचणी वाढणार आहे. त्यामुळे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत, असेही मुश्रीफ यांनी आवर्जून स्पष्ट केले.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved