अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी विधानपरिषदेच्या बारा सदस्यांच्या नियुक्त्या भाजप नेत्यांनी जाणिवपूर्वक रखडविण्याचा कट केल्याचा गौप्यस्फोट नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
आपली सत्ता आल्याशिवाय मंजूरी नाही पत्रकारांना जुनी आठवण सांगताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, माजी मंत्री विनय कोरे यांच्या मातोश्रींचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या सांत्वनासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले होते. त्याच्या आदल्या दिवशीच हा बारा आमदारांचा प्रस्ताव राज्यपालांकडे गेला होता.
तेव्हा विनय कोरे यांनी पाटलांना विचारले की, दादा काय होणार बारा आमदारांचे? तेव्हा चंद्राकांत पाटील म्हणाले होते की, माझे, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांचे बोलणे झाले आहे की, आपली सत्ता आल्याशिवाय ही यादी मंजूर करायचीच नाही. त्यामुळे हे होऊ शकणार नाही.
पाटील आणि कोरे यांचे हे बोलणे सुरू असताना तेथे माझे कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत पाटलांनी त्यांना पाहिलेच नव्हते. मला या वक्तव्याची माहिती मिळाल्यावर तेव्हाच मी हे जाहीरपणे बोललो होतो. आता मला वाटत आहे की, भाजप राज्यपालांची किती अपप्रतिष्ठा करणार आहे?
त्यांच्यावर किती दबाव आणणार आहे? मंत्री छगन भुजबळ राज्यपालांवर दबाव आहे, हे म्हणाले ते खरे आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीला उशीर झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांना संयमित शब्दांत त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली.
मात्र त्यामुळे या प्रकरणात राज्यपाल पदाची अपप्रतिष्ठा झाली आहे. त्यानंतर राज्यपाल आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली, तेव्हा शहा यांनी राज्यपालांना समज दिली असावी,’ असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यानी व्यक्त केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम