अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पळविणारा चोरटा मंदिरात आला असता, मोठ्या शिताफीने त्याला पोलिसांनी जेरबंद केले. बेलेश्वर मंदिर परिसरात भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली. योगेश दुर्गेश साठे असे पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भिंगार येथील राम मंदिराजवळ झोपडीत झोपलेल्या महिलेचे मंगळसूत्र पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
याबाबत तपास करत असताना स.पो.नि. देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर मंगळसूत्र चोर हा बेलेश्वर मंदीर परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स.पो. नि. देशमुख यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने त्याला मोठ्या शिताफीने पकडले.
त्याने चोरीची कबुली देत चोरलेले मंगळसूत्र काढून दिले. दरम्यान फिर्यादी महिलेने चोरट्यास ओळखले. यानेच माझ्या गळ्यातील डोरले चोरलेले आहे,
असे सांगितल्याने योगेश साठे यास सदर गुन्ह्यात अटक करून त्याला पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता, आरोपी साठे याला ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. साठे याच्यावर यापूर्वीही भिंगार कॅम्प, तोफखाना पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम