ज्याची बळीराजाला आस त्यानेच फिरवली पाठ…दुबार पेरणीचे संकट उभेठाक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- यंदा भरपूर पाऊस होऊन पिके चांगली येणार, अशी भविष्यवाणी सर्वत्र करण्यात आली होती. जुलै महिना सुरु झाला तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. गत आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत.

त्याचबरोबर पहिल्या पावसाच्या घातीने झालेल्या पेरण्याही पाऊस लांबल्याने अडचणीत आल्या आहेत. राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली.

जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मान्सून दाखल झाला. त्यानंतर आता चांगला पाऊस होईल या भरोशावर शेतकऱ्यांनी पेरणी कडे कल वाढवला. पण गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसाची उघडीप सुरु आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने सर्वच पिकांच्या दुबार, तिबार पेरण्या करूनही पिके नष्ट झाली होती. परिणामी या वर्षीसाठी जादा दराने बियाणे खरेदी करण्यात आली आहेत.

वाटाण्याचे दरही मागील वर्षीपेक्षा जास्त वाढले असून, भुईमूग बियाणे तब्बल २०० रुपयांवर गेले आहे. कांद्याचे बियाणे व इतर पिकांचे बियाणे जादा भावाने खरेदी करण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या पावसाच्या भरवश्यावर पेरणी केली आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, ते विहिरीचे पाणी देत आहेत. परंतु ज्यांच्याकडे काहीच व्यवस्था नाही ते मात्र अद्यापही हातावर हात मांडून बसले आहेत. जिल्ह्यात पावसाने दडी मारली. त्यातच रोज कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे.

त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी देखील होणार असल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe