अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- खाजगी सावकार शेतकर्यांच्या अशिक्षित पणाचा गैरफायदा घेऊन लाटत असलेल्या शेत जमीनी सावकाराच्या तावडीतून सोडविण्यासाठी 2005 साली बदल करण्यात आलेल्या हिंदू वारसा कायद्याचा आधार घेत पीपल्स हेल्पलाईन व भूमाता ब्रिगेडच्या वतीने हिंदू बहिण वारसा कायदा रक्षा बंधन कार्यक्रम जारी करण्यात आला असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याशी सदर प्रश्नी बोलणे झाले असून, वडिलांच्या संपत्तीत कायद्याप्रमाणे बहिणीला भावाप्रमाणे समान वाटा मिळण्यासाठी तर सावकाराकडे अडकलेल्या जमीनी मुळ शेतकर्यांना परत मिळण्याकरिता पुढाकार घेण्याचे कळविले असल्याचे अॅड. गवळी यांनी सांगितले आहे. भारतात 1956 साली हिंदू वारसा कायदा असतित्वात आला. या कायद्यानुसार वडिलोपार्जीत संपत्तीमध्ये मुलाला वडिलांएवढा हिस्सा देण्यात आला.
मात्र यामध्ये मुलींचा हिस्सा टाळण्यात आला. स्त्री-पुरुष असमानता दर्शविणार्या या कायद्यामध्ये सन 2005 साली केंद्र सरकारने बदल करुन बहिण-भाऊ यांना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिले. मागील वर्षी 2020 साली सर्वोच्च न्यायालयाने लग्न करुन गेल्यानंतर देखील बहिणीचा हिस्सा वडिलांच्या संपत्तीत असल्याचे स्पष्ट केल्याने हा निवाडा क्रांतीकारक ठरला आहे.
यामुळे धनदांडगे व सावकारांनी अशिक्षित शेतकर्यांचा फायदा घेत जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र बहिणीचा हिस्सा विचारात न घेतल्यानी त्यांचा हा व्यवहार पुर्ण होऊ शकलेला नाही. बहिणीच्या हिस्सा विचारात न घेता करण्यात आलेले 12 वर्षा आतील सर्व व्यवहार रद्द करुन बहिणीला जमीनीची मालकी व अधिकार मिळण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे.
धनदांडगे व सावकाराकडे गेलेल्या शेत जमीनीचा अधिकार या काद्यान्वये परत घेण्याचा अधिकार बहिणीला मिळणार आहे. तर सावकाराच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. हिंदू बहिण वारसा कायदा कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी, तहसिलदार व पोलीस अधिकारी यांना राखी बांधून या कायद्याची अंमलबजावणी करुन सावकारापासून संरक्षण मिळण्याची मागणी केली जाणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|