अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- घाटकोपर परिसरातील एका खासगी इमारतीच्या परिसरातील विहिरीत बुडालेली कार अखेर 12 तासांनी बाहेर काढण्यात आली. रविवारी सकाळी ही कार विहिरीत बुडाली होती.
या इमारतीच्या परिसरात एक विहीर होती. मात्र, सोसायटीने ती विहीर बुजवून त्यावर आरसीसी बांधकाम केले होते. त्यानंतर विहीरीचा भाग गाड्यांच्या पार्किंगसाठी वापरला जात होता.
दरम्यान गेल्या चार दिवसांपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जमीन भुसभुशीत झाली होती.
अखेर रविवारी सकाळी याठिकाणी खड्डा पडून कार अवघ्या काही मिनिटांमध्ये विहिरीत बुडाली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
त्यानंतर ही कार विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करुन क्रेनच्या साहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली.
ही कार बाहेर काढली तेव्हा तिची अवस्था बघण्यासारखी झाली होती. घाटकोपर परिसरात पार्क केलेली कार नेमकी कशामुळे बुडाली याबाबत अनेक तर्क लावले जात होते.
मात्र, त्यामागचे नेमके कारण आता समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या घाटकोपर परिसरात विहिरीवर एक स्लॅब टाकला होता.
अर्धी विहीर झाकून स्लॅबच्या माध्यमातून त्यावर पार्किंगसाठी जागा करण्यात आली होती. हा स्लॅब पूर्णपणे जीर्ण झाला होता.
या स्लॅबवर घाटकोपरच्या कामा लेनवरील रामनिवास या इमारतीत राहणारे डॉ. दोशी यांनी गाडी पार्क केली होती. यावेळी त्यांनी गाडी पार्क केल्यानंतर विहिरीवरील स्लॅब कोसळला. परिणामी कार थेट पाण्यात बुडाली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम