अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या महाविद्यालये बंद असून ऑनलाईन क्लासेस सुरु आहे. अशा परिस्थितीत परीक्षा कशा घ्यायचा हा प्रश्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनासमोर आहे.
अशातच मंगळवारी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत प्रथम सत्राच्या परिक्षेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न सुमारे साडे सहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 मार्च ते 30 मार्चपासून सुरु करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
मात्र परीक्षेचे काम जुन्याच एका एजन्सीला देणे नियमाला धरुन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या 15 मार्चपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरु करणं शक्य नसल्याचं स्पष्ट आहे.
परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून एजन्सीमार्फत परीक्षा घ्यावी लागणार आहे. अशा स्थितीत सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष आजच्या परीक्षा मंडळाच्या निर्णयाकडे लागलं आहे.
परीक्षा होणार की नाही? झाली तर ती कधी आणि कुठे होईल? असे संभ्रमाचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. विद्यापीठाच्या नियोजित वेळापत्रकानुसार येत्या सोमवारपासून प्रथम सत्राची परीक्षा होणार आहे.
मात्र या परीक्षेसाठी नेमावयाच्या एजन्सीचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आठवभरात सुरू होणारी ही परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट आहे.
विद्यापीठाने अद्यापपर्यंत याविषयी कोणताही निर्णय घेतला नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. विद्यापीठाने परीक्षेबाबतचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|