अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही निर्बंध लादले आहेत. मात्र राहुरी स्टेशन परिसरातील एका मंगल कार्यालयात विवाहादरम्यान डिजे लावून, मोठी गर्दी जमवली.
मात्र तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या आदेशाने महसूल व पोलिसांनी वधू व वर पक्षासह मंगल कार्यालय मालकाला दंड ठोठावला आहे. याबाबत सविस्तर असे की, राहुरी स्टेशन परिसरात एका मंगल कार्यालयात काल मोठ्या थाटात विवाह सुरु होता.
डीजेसह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. याबाबत तहसीलदारांना ही माहिती समजताच त्यांनी नायब तहसीलदार पूनम दंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिसांचे पथक विवाहस्थळी पाठवले.
डीजेच्या तालावर मिरवणूक सुरू असताना हे पथक दाखल होताच अनेक वऱ्हाडी मंडळींनी पळ काढला. नायब तहसीलदार पूनम दंडीले यांनी वधू व वर पक्षाच्या लोकांकडून तीस हजार तर मंगल कार्यालय मालकाकडून पंधरा हजारांचा दंड आकारून मंगल कार्यालय सील करण्याचा आदेश दिला.
परंतु या ठिकाणी बड्या नेत्याचा फोन आल्याची चर्चा सुरू होती. राहुरी तालुक्यात कनगर येथे एका विवाह सोहळ्यात नवरदेवासह अनेक जण कोरोना बाधित झाल्याची घटना ताजी असताना अद्याप नागरिक गंभीर दखल घेत नसल्याचे समोर आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम