स्वच्छतेतूनच निरोगी आरोग्याची मुहुर्तमेढ रोवता येणार -अनिता काळे

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- पाईपलाइन रोड, लेखानगर येथे पोवाड्यातून बालशाहीर निष्ठा सुपेकर व तृप्ती गायकवाड यांनी सार्वजनिक स्वच्छता व मतदार जागृती केली. अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व जिजाऊ ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.

या अभियानंतर्गत झालेल्या कार्यक्रमात बालशाहीरांनी आपल्या पोवाडे व गीतांमधून सार्वजनिक स्वच्छता व मतदानाचे महत्त्व विशद केले. त्यांना वाद्यांवर बालकलाकार आशिष सुपेकर व गीतकार सुनिल महाजन यांनी साथ दिली. प्रलोभन, दबाव व आमिषाला बळी न पडता मतदान करु या, योग्य लोकप्रतिनिधी निवडून देशाचा विकास साधूया, स्वच्छता पाळून रोगराई टाळूया… आदी गीतांद्वारे स्वच्छता पाळण्याचे व मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन करण्यात आले.

गीतकार सुनिल महाजन यांनी देखील जनजागृतीवर विविध गीते सादर केली. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी सार्वजनिक स्वच्छता न पाळल्याने समाजामध्ये रोगराई पसरत आहे. कोरोनाच्या संकटानंतर स्वच्छतेला महत्त्व प्राप्त झाले असून, कुटुंबाच्या निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे.

तर शंभर टक्के मतदान न झाल्याने देशाची प्रगल्भ लोकशाही धोक्यात येत आहे. यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे त्यांनी आवाहन केले. जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय संघटक अनिता काळे यांनी सार्वजनिक स्वच्छता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनल्यास शहर व गाव निर्मळ होणार आहे. स्वच्छतेतूनच निरोगी आरोग्याची मुहुर्तमेढ रोवता येणार आहे.

तर समाजाने जागृक राहून शंभर टक्के मतदान करण्याची गरज व त्याचे महत्त्व सांगितले. यावेळी नवनाथ गीते, खुशी मोहिते, नवनाथ गीते, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, अनिता दहीफळे, स्वाती सारुक, पांडूरंग म्हस्के, मिनाक्षी जाधव,

गीता अवारी, मिनाक्षी वाघस्कर, कावेरी जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe