निर्बंधकाळात मदत पॅकेज पात्र लाभार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-  कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी व निर्बंधकाळात जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहचले पाहिजेत.

त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजअंतर्गत देण्यात येणारी मदत संबंधित घटकांपर्यंत तात्काळ पोहचवण्याच्या कार्यवाहीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.

त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलल्या पॅकेजअंतर्गत सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आदिवासी विभागाच्या १२ लाख लाभार्थ्यांना आगावू मदतीचे तात्काळ वितरण,

बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगार, घरेलु कामगार, राज्यातील फेरीवाले, रिक्षाचालक व विविध समाजघटकांसाठी जाहीर केलेल्या मदतीचा निधी तात्काळ वितरित करावा.

यासाठी आवश्यक शासन निर्णय, निधी वितरणाचे आदेश जारी झाले आहेत. उर्वरित आदेशही तात्काळ जारी व्हावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतील तीस टक्के निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याअंतर्गत ३ हजार ३३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार १०० कोटी रुपयांचा निधीचे वितरणही झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व उपचारांसाठीच खर्च करण्यात यावा. उर्वरित निधीही गरजेनुसार तातडीने वितरीत करण्यात यावा.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe