अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-दहशतवाद्यांचे कायमच लक्ष्य राहिलेल्या मुंबईत तब्बल दोन हजार किलो आरडीएक्स सापडले. दहशतवाद्यांनी मागील काही वर्षांत विविध ठिकाणी आरडीएक्स किंवा टीएनटीसारखी स्फोटके दडवून ठेवली होती.
त्याखेरीज अशा प्रकारची अनेक स्फोटके पोलिसांनी अटकेत असलेल्या दहशतवादी संबंधितांच्या चौकशीतून हुडकून काढली होती.
अशा सर्व न फुटलेल्या संबंधित स्फोटकांचे वजन तब्बल दोन हजार किलो असल्याचे भूदलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत समोर आले आहे. ही स्फोटके लष्कराने विविध सरकारी विभागांच्या सहकार्याने शोधून त्याची विल्हेवाट लावली आहे.
त्यासाठी पुण्यात मुख्यालय असलेल्या भूदलाच्या दक्षिण कमानने विशेष मोहीम हाती घेतली आहे. संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले की, अशाप्रकारच्या भंगारात पडून असलेल्या किंवा वापरात न आलेल्या परंतु जिवंत असलेल्या स्फोटकांची माहिती लष्कराने संरक्षण दले,
पोलिस, केंद्रीय रसायने मंत्रालय, सिंचन विभाग, रस्ते बांधकाम विभाग आदींकडून घेतली. त्यानंतर एका निश्चित मार्गदर्शक तत्त्वांद्वारे भूदलाच्या पुलगावच्या केंद्रीय शस्त्रागार डेपोच्या विशेष बॉम्बनाशक पथकाद्वारे त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
मुंबई ही कायमच दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिली आहे. या अंतर्गतच स्फोटकेमुक्त बंदरे अशी ही मोहीम आहे. या अंतर्गत विविध प्रकारच्या पडून असलेल्या व कालबाह्य झालेल्या स्फोटकांची विल्हेवाट लावली जाते.
त्यामध्ये कारखान्यांत वापरली जाणारी, रस्त्याच्या कामासाठी वापरली जाणारी, सिंचनांतर्गत विहीर किंवा कूपनलिका खोदण्यासाठी लागणारी, नौदलाच्या विविध तोफांसाठी लागणारी परंतु न फुटलेली स्फोटके; बॉम्ब, भूदलाची स्फोटके या सर्वांचा समावेश आहे.
दक्षिण कमांड मुख्यालयाने राजस्थानपासून ते कर्नाटकपर्यंतच्या परिसरात ही विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये एकट्या मुंबईत दोन हजार किलो आरडीएक्स किंवा टीएनटी या अतिज्वलनशील स्फोटकांसह एकूण आठ लाख किलो स्फोटके सापडली.
त्यांची लष्कराने मुंबईत गुप्तस्थळी विल्हेवाट लावली. मुंबई अंतर्गत संपूर्ण कोकण किनारपट्टीवरून अशी स्फोटके गोळा करण्यात आली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|