अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अॅड. असीम सरोदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जिलेटीन स्फोट प्रकरणात अंबानी यांची तक्रार कुठे आहे? असा सवाल करतानाच सचिन वाझेंच्या प्रकरणात राजकारणच अधिक होताना दिसत आहे, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अॅड. सरोदे म्हणाले, सचिन वाझेच्या कारवाईत राजकारण जास्त दिसतंय. कायद्याचा राजकारणासाठी आपल्या सोयीनुसार वापर केला जातोय, एनआयएनं राष्ट्रीय गुन्ह्याचा तपास करणं अपेक्षित आहे. वाझे आता नियमित जामिनासाठी अर्ज करू शकतात.
त्यांची चौकशीसाठी गरज नसेल आणि ते तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार असल्याचे कोर्टाला वाटलं तर त्यांना जामीन मिळू शकतो, असेही सरोदे म्हणाले. अॅड. सरोद म्हणाले वाझे यांनी काही चूक केलं असेल तर त्यांना शिक्षा मिळणारच. मात्र, त्यासाठी त्यांची नार्को टेस्टची मागणी काही नेते करत आहेत. नार्को टेस्ट करणं हे बेकायदेशीर आहे. ही मागणी चुकीची आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सात वेगवेगळ्या प्रकरणात त्याबाबतचा निर्णय दिला आहे. तसेच मानवी हक्क आयोगानेही नार्को टेस्ट बाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्यामुळे नार्को टेस्ट होऊ शकत नाही. अशा नेत्यांनी चुकीची मागणी करून लोकांना अज्ञानाकडे नेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|