अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.
यातच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा घटना घडल्या असून शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागात रविवारी ( दि.३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांसह घरे, दुकानांचे मोठे नुकसान झाले.
काही ठिकाणी गारपीट झाली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यात दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे धान्य पावसात भिजले तर काही ठिकाणी सुसाट वाऱ्यामुळे घरावरची पत्रे उडून गेल्याने संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे.
काही ठिकाणी तर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने त्यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. व या घटनेची माहिती संगमनेरात मिळताच नुकसानीबाबत प्रशासनाला कळविण्यात आले आहे. सर्व नुकसानग्रस्तांना प्रशासनानेे मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम