अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य आरोपी बाळ बोठेच्या पोलिस कोठडीची आज मुदत संपत असल्याने त्याला पारनेर न्यायालयासमोर दुपारच्या सत्रात हजर करण्यात आले. न्यायालयाने बोठेला शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करण्याचा निर्णय दिला आहे.
हैद्राबाद येथून बोठे यास अटक करण्यात आल्यानंतर दि. १४ मार्च रोजी त्यास पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी प्रथम वर्ग न्यायाधिश उमा बोऱ्हाडे यांनी बोठेला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर अनुक्रमे चार व दोन दिवसांची पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली. गुरूवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने बोठे यास पुन्हा न्यायालापुढे हजर करण्यात आले.

एक दिवस पोलिस कोठडी शिल्लक राहिल्याने पोलिसांनी बोठेस पोलिस कोठडी न मागता त्याची न्यायालयीन कोठडीत रवाणगी करण्याची न्यायाधिश उमा बोऱ्हाडे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार बोेठे यास पारनेरच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळ बोठे फरार असताना त्याच्याविरोधात शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवालीच्या गुन्ह्यात वर्ग करण्याचा निर्णय न्यायालयाने आज दिला आहे. कोतवाली पोलिसांनी त्यासाठी याअगोदरच अर्ज दाखल केला होता.
आज दुपारी आरोपी बोठेला ताब्यात घेण्यासाठी कोतवाली पोलिसांचा मोठा फौजफाटा हजर होता. बोठे याच्याविरोधात महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. रेखा जरे यांच्या हत्येनंतर बोठे हा हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर बोठे फरार झाला. त्याच वेळी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात बोठे याच्याविरोधात महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
बोठे फरार असल्यामुळे कोतवाली पोलिसांनाही बोठे हवा होता. विनयभंगासह बोठे याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात इतरही गुन्हे दाखल आहेत. सुरूवातीस विनयभंगाप्रकरणी त्यास ताब्यात घेण्यात आले असल्याचे कोतवालीचे पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी सांगितले.
गेल्या तेरा दिवसांच्या पोलिस कोठडीत बोठे याने दिलेल्या माहीतीच्या अधारे येत्या अडीच महिन्यात पुरावे संकलीत करण्यात येणार असून त्यानंतर बोठे याच्या विरोधात पारनेर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान बोठे याचा आयपॅड, अॅपल कंपनीचा मोबाईल याचे पासवर्ड त्याने पोलिसांना सांगितलेले नाहीत.
ते आठवत नसल्याचे तो सांगत होता. आता आयपॅड तसेच मोबाईल शुक्रवारी मुंबईतील फॉरेन्सीक लॅबमध्ये लॉक उघडण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|