चौकशी समितीने घेतली ‘जलयुक्त’ची झाडाझडती !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- सेवानिवृत्त सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने बुधवारी नगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या तक्रारींची झाडाझडती घेतली.

यावेळी उपस्थित तक्रारदारांशी विजयकुमार यांनी थेट संवाद साधला. यावेळी तक्रारींच्या संबंधित मुद्द्यांची विचारणा संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडे केली असता

त्याबाबत होणारी दिरंगाई लक्षात आल्यावर भर बैठकीत विजयकुमार यांनी अधिकाऱयांची चांगलीच कानउघडणी केली. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱयांची चांगलीच गाळण उडाली.

‘आम्ही कोणाला दोषी ठरवायला आलेलो नाही. स्वतःस अपराधी न समजता चौकशी समितीला आवश्यक माहिती सादर करा. वेळ मारून नेवू , या भ्रमात राहू नका. अन्यथा टाळाटाळ महाग पडेल.’ असा इशारा देखील दिला.

टँकरमुक्त महाराष्ट्र असा संकल्प करीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तारूढ असलेल्या मागील सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली.

या योजनेत करण्यात आलेल्या कामांविषयी राज्यातील अनेक भागात तक्रारी करण्यात आल्या. सत्ता बदल झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विद्यमान महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त विषयीच्या तक्रारींची दखल घेत चौकशी कामी सेवानिवृत्त सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली.

प्रत्येक महसूल विभागातील एका जिल्ह्याची निवड चौकशीसाठी करण्यात आली आहे.  जलयुक्त विषयी मार्च २०१९ पर्यंत प्राप्त तक्रारींची चौकशी व शहानिशा हि समिती करणार असून, येत्या जून पर्यंत या संबंधीचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.

नगर जिल्ह्यातील जलयुक्त योजनेच्या तक्रारींच्या चौकशीसाठी समिती नगर दौऱ्यावर आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनच्या सभागृहात या खुल्या चौकशी बैठकीचे कामकाज झाले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe