8 दिवसांत सुरळीतपणे पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  प्रभाग क्रमांक 2 मधील संपूर्ण पाईपलाईन रोड व इतर परिसरामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, याला पुर्णपणे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव-गलनाथ कारभार जबाबदार आहे.

8 दिवसांत या भागातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा आपल्याला कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता नागरीकांसह

आपल्या दालनात तीव्र स्वरुपांचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रभागाच्या चारही नगरसेवकांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी मनपाचे आयुक्त शंकर गोरे यांना भेटून निवेदन देऊन वस्तूस्थिती व कृत्रिम पाणी टंचाई कशी निर्माण झाली, याबाबत निवेदन देऊन चर्चा केली.

3 महिन्यांपासून संपूर्ण परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तरे ते देतात. नागरिक आमच्याकडे नियमितपणे, पुरेसा दाबाने पाणीपुरवठा करण्याबाबत वेळोवेळी मागणी करतात.

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या रोषाला मात्र आम्हाला विनाकारण सामोरे जावे लागते, असे निखिल वारे यांनी आयुक्तांना सांगितले. या परिसरात कोणत्याही नवीन वसहती तयार झालेल्या नाहीत.

लोकसंख्या वाढलेली नाही मग पाणी टंचाई कशी निर्माण झाली असा प्रश्‍न यावेळी उपस्थित केला. याबाबत आयुक्त शंकर गोरे यांनी निवेदन स्विकारुन चौकशी करुन प्रश्‍न मार्गी लावू, असे सांगितले.

8 दिवसात प्रश्‍न सुटला नाही तर आंदोलन करु, असा इशारा निवेदनात दिला. यावर नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार यांच्या सह्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe