अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत युद्धपातळीवर सुरु आहे. यातच कोरोना युद्ध म्हणून आपली सेवा बजावत असलेले
आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे लसीकरण मोहीम वेगाने पार पडत आहे. मात्र याला कलंक लागेल अशी एक घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे.
चक्क दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या रुग्णाला शिवीगाळ करत दमदाटी केली.
आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक संतोष म्हस्के असे या कर्मचाऱ्याचे नाव असून कोपरगाव तालुक्यातील वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात हि घटना घडली.
या मद्यपी कर्मचाऱ्याला खुद्द पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगात दारूचा संचार असल्याने पोलिसांनाही या बहाद्दराने दाद दिली नाही.
शेवटी पोलिसांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नेत या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवारी वारीतील भरत गंगाधर वाघ हे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते.
वाघ यांनी लसीसंदर्भात म्हस्के यांच्याकडे चौकशी केली. त्यावर म्हस्के यांनी वाघ यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावर पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे आपल्या फौजफाट्यासह वारी केंद्रात दाखल झाले. समजावून सांगूनही ऐकत नसल्याने पोलिसांनी या कर्मचाऱ्याला कोपरगाव येथे नेवून त्याची आरोग्य तपासणी केली.
त्यात कर्मचारी दारू प्यायलेला असल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी संतोष म्हस्के याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|