नगर शहरात सुमारे तासभर जोरदार वाऱ्यासह पावसाचे थैमान

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- भारतीय हवामान खात्याने नगरसह राज्यातील अन्य जिल्ह्यात सलग तीन ते चार दिवस वादळी वार्‍यासह मान्सून पूर्व पावसाचा इशारा दिला आहे.

त्यानुसार सोमवारी शहरासह उपनगरात सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभर नगरकर उकाड्याने हैराण झाले होते.

दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. सायंकाळी साडेचारनंतर वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली.

नगर शहरासह केडगाव, सावेडी, नागापूर, बोल्हेगाव, भिंगार परिसरात एक तासभर जोरदार पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. दरम्यान, शहरातील नालेगाव, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, अप्प चौक, निलक्रांती चौक, कापड बाजार, एमजी रोड, नवीपेठ चौक, तेलीखंट, नेता सुभाष चौक, नालेगाव रोड यासह अन्य सखल भागात पहिल्याच पावसात रस्त्यावर पाण्याचे तळे झाले होते.

सुमारे एक तासांहून अधिक झालेल्या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. जोरदार पावसाने शहरात वातावरणातील उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना दिलासा मिळाला. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वार्‍यामुळे होणार्‍या पावसाने नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe